व्यक्तिवेध : कवी ग्रेस

व्यक्तिवेध : कवी ग्रेस

 व्यक्तिवेध : कवी ग्रेस 

     मराठी कवितेच्या प्रांतात प्रतिभावंत कवी म्हणून स्वतःचा वेगळा वाचकवर्ग असलेले कवी ग्रेस हे साठोत्तर काळात प्रसिद्धीस आले. त्यांचे मूळ नाव माणिक सिताराम गोडघाटे. १० मे १९४० रोजी नागपूरच्या कर्नलबाग येथे त्यांचा जन्म झाला. ग्रेस यांचे बालपण दुःखात आणि एकाकीपणात गेले. त्यामुळे लहान वयात त्यांचा एकलेपणाच्या पोरकेपणाच्या दुःखाशी परिचय झाला. हे एकाकीपण सोसत सोसतच ग्रेस यांनी या एकाकीपणाशीच सख्य साधले. व्यसनी वडील, सावत्र आया आणि लहान लहान भावंडे या सर्वांतून भोगावे लागलेले दुःख आणि क्षयी मरणोन्मुख आई अशा प्रतिकूल परिस्थितीत ग्रेस वाढले. त्याच वेदना पुढे त्यांच्या कवितेतून व्यक्त होत गेल्या.




स्वतःच्या या सर्व परिस्थितीबद्दल ग्रेस म्हणतात,

“सुमित्रा सोडून चार सावत्र आया, प्रचंड बायामाणसांचे कुटुंब. आदिम गुहेतील इच्छा वासनांचे बंध अनुबंध लहानपणीच दिसले.
सुमित्रा गेल्यावर मी पूर्ण एकटा पडलो; आणि तिथेच बालपण शिळेसारखे गोठले. तेव्हाचे भय... सुमित्रेच्या जीवाचे मैत्र काय वर्णू? “Irrespective of my growing age, I was competed to retain a stupid, of sensitive child inside my ribs” या सुमित्रेच्या दिग्दर्शनाने माझे जीवनधर्म सृजनाच्या दर्पणापुढेच अभिमुख केलेत.”

ग्रेस यांच्या स्वकथनातूनच त्यांचे पोरकेपण व्यक्त झाले आहे. संध्याकाळच्या वेळी लहान लेकरास आई जवळ नसण्याचे दुःख जीवघेणे असते. शिवाय घरात रोजच चटके देणारी तप्त स्थिती
असावी, ग्रेस कवितेत लिहितात,

“ देऊळात आई गेली
अन्‌ बालपणावर माझ्या
चंद्राची राख पसरली. ” (चंद्रमाधवीचे प्रदेश, गावातल्या आठवणी)

      ग्रेस एम.ए.(मराठी) ची परीक्षा प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्या वर्षीचे ना. के .बेहरे सुवर्णपदक त्यांना मिळाले. १९६६ ते १९६८ याकाळात धनवटे नॅशनल कॉलेज येथे आणि इ.स. १९६८ पासून ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर २००४ पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मराठी विभागात व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. 'सौंदर्यशास्त्र' या विषयाचे अध्यापनही या विद्यापीठात त्यांनी केले. इ.स. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते. ग्रेस यांनी केलेले “युगवाणी” चे संपादन हे ग्रेस यांचे चोखंदळ वाड्मयीन कर्तृत्व आहे. ‘संदर्भ’ चे संपादन त्यांनी यशस्वीपणे केले म्हणूनच हृदयनाथ मंगेशकर, किशोरी अमोणकर, प्रभा अत्रे यांनीही ‘संदर्भ’ साठी लेखन केले असे ग्रेस यांचे म्हणणे आहे..

     ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’ या ललित लेखसंग्रहास आणि ‘संध्याकाळच्या कविता’ व ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ या दोन कवितासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले आहेत. तसेच त्यांच्या 'राजपुत्र आणि डार्लिंग” या कवितेला ‘उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती'चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या “संध्यामग्न पुरुषाची लक्षणे” या ललितलेख संग्रहाला सोलापूरचा “'भैरूरतन दमाणी” पुरस्कार मिताला आहे.


     डॉ.लीला गुणवर्धिनी यांच्याशी ग्रेस यांचा विवाह केवळ दोन मित्रांच्या साक्षीने झाला. परंतु एकटेपण हे जणू ग्रेस यांचे प्राक्तनच होते.... कारण ग्रेस यांच्या वैवाहिक जीवनातील आनंदही मृत्यूने हिरावून नेला. कारण डॉ.लीला सतत आजारी असत. ग्रेस यांना आणखी एकटेपणाचे दुःख देऊन त्या स्वर्गवासी झाल्या. ग्रेस
पत्नीच्या मृत्यूने कातर झालेले दिसतात. “संध्याकाळच्या कविता'तील मनोगतात ग्रेस यांनी त्याचे सर्व श्रेय त्यांच्या पत्ती डॉ.लीला गुणवर्धिनी यांना दिले आहे. ग्रेस यांना 'मिथिला!
आणि "“माधवी” या दोन मुली आणि 'राघव” हा मुलगा अशी तीन अपत्ये. पत्नी लीलाच्या मृत्यूनंतर ग्रेस यांनी या तिन्ही मुलांना आईच्या मायेने वाढविले.

     कविता हे ग्रेस यांचे पहिले प्रेम आणि संगीत हा त्यांचा श्वास आहे. झपाटलेपणाने वाचन करणे आणि चित्रपट पाहणे हे त्यांचे आवडते छंद आहेत. रोज पहाटे ग्रेस पोहायला जात. त्याचा उल्लेख ते प्रत्येक व्यक्तीशी बोलताना जाणीवपूर्वक करतात. त्याचे स्पष्टीकरण ते देतात ते असे,

     “तुम्ही अगदी भल्या पहाटे म्हणजे चार वाजताच रोज पोहायला जाता. तो याच उत्स्फूर्त जगण्याचा भाग का?... एकांतासाठी आणि प्रार्थनेसाठी मी एवढ्या लवकर म्हणजे पक्षीही उठायच्या आत पोहायला जातो. पक्ष्यांच्या आवाजानंही प्रार्थना मोडावी, हे मल आवडत नाही. कवितेसाठी ही प्रार्थना असते. कवितेसाठी मी जी अफाट किंमत चुकती करत असतो, त्याचाच एक भाग! ही किंमत चुकती करतो म्हणूनच ती कविता रसिकाचाही सन्मान करते. रसिकाला त्याच्या बाजूनं चार पावलं चालायला लावते. एखाद्याला आपल्या योग्यतेचा करणं म्हणजे सन्मानच करणं. तो अपमान कसा ठरेल?”

     ग्रेस या नावाविषयी आपल्याला कुतूहल निर्माण झाले असेलच, तर या नावामागेही एक विशेष कहाणी आहे! इ.स. १९५८ पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन गोडघाट्यांनी "ग्रेस" हे साहित्यिक नाव धारण केले. ''दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस'' या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे गोडघाट्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला; तिचे ऋण आठवीत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे गोडघाट्यांनी अक्षयकुमार काळे यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.

कर्करोगाशी सुमारे तीन वर्षे लढा दिल्यानंतर अखेर वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी म्हणजेच २६ मार्च २०१२ या दिवशी कवी ग्रेस यांचे पुणे येथे निधन झाले.

0 Response to "व्यक्तिवेध : कवी ग्रेस "

टिप्पणी पोस्ट करा