व्यक्तीवेध : कविवर्य पु.शि. रेगे
रविवार, २० फेब्रुवारी, २०२२
Comment
आधुनिक मराठी वाढवण्याच्या इतिहासात पु.शि.रेगे यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. मराठी वाड्मय क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करूनही पु.शि.रेगे जरा उपेक्षितच राहिले. विसाव्या शतकातील चोखंदळ समीक्षा दृष्टी असलेले समीक्षक, प्रयोगशील कवी, कथाकार, कादंबरीकार, पृथक वृत्तीचे नाटककार पु.शि.रेगे असे साहित्यिक व्यक्तित्व लाभलेल्या पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मिठबाव येथे २ ऑगस्ट १९१० रोजी झाला. त्यांचे वडील शिवरामपंत कराची शहरात आयात निर्यात करणाऱ्या एका जर्मन संस्थेत जकात अधिकाराच्या पदावर होते. काही वर्षे नोकरी केल्यावर त्यांनी स्वतःची व्यापारी कंपनी सुरू केली. त्यांचे राहणीमान श्रीमंत स्वरूपाचे होते. अशा श्रीमंत हिंदूधर्मीय गौड सारस्वत ब्राह्मण शाखेतील स्मार्त पंथीय एकत्रित कुटुंबात पु.शि.रेगे यांचे बालपण गेल्याने अनुकूल वातावरणात त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले.
पुरुषोत्तम रेगे यांचे १९२० ते १९२७ या काळातील प्राथमिक शिक्षण मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात झाले. नेहमीच प्रथम क्रमांक पटवणारे रेगे आपल्या गुरुजनांबद्दल आदराने लिहितात, “कवितेची कविता म्हणून जाणं प्राप्त झाली ती आमच्या शाळेतील प्रिन्सिपल रेव्हरंड कटवर्थ यांच्यामुळे, त्यांनी साधे सोपे कसे लिहावे ते शिकवले.
असे म्हणतात की, कवी हा जन्मावा लागतो तो निर्माण करता येत नाही. या दृष्टीने रेगे हे जन्मजात कमी होते हे त्यांच्या शालेय जीवनात त्यांनी केलेल्या वाड्मयीन लेखनाने सिद्ध होते. त्यांनी ‘सत्यमेव जयते’ , ‘चांडाळ चौकडी’ यांसारखे नाटके, शिवाय कृष्ण जीवनावर एक संस्कृत नाटक लिहायला प्रारंभ केला होता. ‘बालमित्र’ या हस्तलिखितात रेगे ‘विनोद’ या टोपण नावाने गोष्टी लिहित. मात्र त्या गोष्टी विनोदी नव्हत्या तर मध्ययुगीन भारतेतर देशांच्या संदर्भात असलेल्या मध्ययुगीन काळातील होत्या. त्यांची चिनी भाषेतील ‘अद्भुत आणि सुरस कथा’ या नावाची कथा मला मराठी बालमित्र मध्ये छापून आली होती.
रेगे यांनी १९३१ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्राची बीए ऑनर्सची पदवी प्रथम वर्गात प्राप्त केली. त्यांचे हस्ताक्षर आणि उत्तरपत्रिकांचे सादरीकरण इतके उत्तम होते की, त्यांची उत्तरपत्रिका ‘आदर्श उत्तरपत्रिका’ म्हणून महाविद्यालयाच्या फलकावर लावल्या जात. पदवीधर झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना आय सी एस च्या परीक्षेसाठी लंडनला पाठविले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत प्रोफेसर केन्स यांच्या मार्गदर्शनाखाली रेगे दोन वेळा आयसीएस परीक्षेला बसले. पण दोन्ही वेळेला ते अपयशी ठरले. त्यांच्या या अपयशाबद्दल त्यांचे परममित्र श्री वा.रा. ढवळे लिहितात, “रेगे हे साम्यवादी विचारसरणीच्या वाड्मयात रमू लागले होते. आणि त्यांचे मित्रही साम्यवादी विचारांचे होते. याची नोंद शासकीय गुप्तचर संस्थेने घेतली होती. शिवाय सविनय कायदेभंगाच्या विद्यार्थ्यांच्या चळवळीत रेगे सामील झाले होते. त्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक उत्तीर्ण केले गेले नाही. शिवाय त्यांनी एका संस्कृत प्रश्नाचे उत्तर गद्यात न लिहिता पद्यात लिहिले होते. परीक्षकांना ते कळले नाही. म्हणून त्यांना आयएएस परीक्षेत अपयश आले. यानंतर रेगेंनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स संस्थेतून त्यांनी बीएस्सी ची पदवी प्राप्त केली.
कवितेचे तंत्र कितीही समजले तरी कविता फुलण्यासाठी प्रतिभेबरोबरच जीवनात प्रेमही हवेच. मग ते प्रेमाचे स्वरूप तारुण्यसुलभ प्रीती असो, देशभक्ती असो, निसर्ग प्रेम असो, किंवा ईश्वरभक्ती असो, प्रेम हवेच. त्याशिवाय काव्य उमलत नाही. लंडन मधील वास्तव्यात डॉक्टर कॅट साळझ् या जर्मन तरुणीशी त्यांची परिचयातून परस्परांना प्रीति जडली होती. तिचे नाव त्यांनी राधा असे ठेवले. परंतु या राधेशिवाय त्यांना भारतात परत यावे लागले. परंतु उरलेले सर्व आयुष्य त्यांनी रसिकांना उत्तम कवितेचा गुलकंद देण्यात सार्थकी लावले. भारतात आल्यावर रेगे यांनी ‘सरिता’ नावाच्या शालीन तरूणीशी विवाह केला. या दांपत्याला उदयन, मनोज आणि अलकनंदा ही तीन अपत्ये झाली.
भारतात परत आल्यावर त्यांनी १९३६-१९३७ या काळात पुणे येथील वाडिया महाविद्यालयात अर्थशास्त्र आणि त्यानंतर एक वर्ष अहमदाबाद येथे आर्ट कॉलेजमध्ये इतिहास विषयाचे अध्यापन केले. १९३८-१९४६ या काळात ते मुंबईच्या सिडेनहॅम वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. १९५८ पासून १९६२ पर्यंत इस्माइल युसूफ महाविद्यालयत प्राचार्यपदाची त्यांनी धुरा वाहिली. ज्या एलफिस्टन महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून शिकले त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य पद भूषविण्याचा आनंददायी योग रेगे यांना लाभला. यानंतर १९६९ मध्ये पणजी येथे श्रीनिवास डेम्पो वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्यपदी त्यांची नेमणूक झाली. गौड सारस्वत रेगे यांची कुलदेवता ही गोमंतकातील ‘कवळे’ येथील देवी असल्याने रेगे गोमंतकात न रमले तरच नवल! त्यानंतर १९६९ ते १९७१ पर्यंत रेगे वडगावच्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत राहिले व तेथेच सेवानिवृत्त झाले.
रेगे यांना त्यांच्या आयुष्यात जे मानसन्मान मिळाले तेही त्यांच्या वाड्मयीन कर्तृत्वाचा गौरव करणारेच आहेत. १९६४ साली मास्को येथील लघुकथा या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादासाठी भारतीय प्रतिनिधी म्हणून रेगे यांची निवड झाली. त्या परिसंवादात त्यांनी भारतीय प्रतिनिधी म्हणून भाग घेतला. केरळ येथे १९६७ साली अखिल भारतीय लेखक परिषद आयोजित केली होती. या परिषदेचे रेगे उद्घाटक होते. १९६९ साली भरलेल्या वर्धा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान त्यांना मिळाला. त्यांनी सर्वच प्रकारच्या क्षेत्राचा आत्मविश्वासपूर्वक संचार केला. १९५४ ते १९६० या काळात त्यांनी ‘छंद’ या त्रैमासिकाचे संपादन केले. ‘छंद’ त्यांनी खूपच मनस्वीपणे चालविले. अनेकांचे हात ‘लिहिता’ करण्यामागे रेग्यांच्या ‘छंद’ या त्रैमासिकाचे पर्यायाने रेगे यांचे श्रेय आहे. १७ फेब्रुवारी १९७८ रोजी पु.शि.रेघे यांचा मृत्यू झाला.
रेगे पाश्चात्त्य काव्याच्या काही लकबी मराठीत आणण्याचा प्रयत्न करीत होते. इटालियन कवींच्या प्रेमकवितांनी व त्यातून वाहणार्या उत्कट अशा मनोहर भावनांनी त्यांच्या कविमनावर भुरळ पाडली होती. म्हणून त्यांच्या कवितांमधून स्त्री शक्ती आणि तिचे स्त्री देहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या स्वप्निल रूपांमध्ये प्रकट होताना दिसते. त्यांच्या काव्यात संस्कृतप्रचुर शब्दांची मधुर पखरण असे. “जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे“; अशी त्यांची श्रद्धा व धारणा होती.
“फुलोरा“, “दोला“, “गंधरेखा“, “पुष्कळा“ , “दुसरा पक्षी“, “आणि प्रियाळ“ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत; “रूपकथ्थक“, “मानवा“ यांतील काही कथा गुजराती, फ्रेंच, जर्मन, स्वीडिश, स्पॅनिश ,रशियन आणि चिनी या भाषांत भाषांतरित झाल्या आहेत. तसेच “सावित्री“, “अवलोकिता“, “रेणू“ , आणि “मातृका“ या कादंबर्या दर्जेदार व अर्थपूर्ण आहेत. “छांदसी“ हा रेगेंच्या समीक्षालेखांचा संग्रह आहे. या साहित्याखेरीज त्यांनी काही शैक्षणिक पुस्तकेही लिहिली आहेत. छंद या द्वैमासिकाचे संपादन ही रेगे यांची आणखी एक क्षणीय कामगिरी होय. हे भाषा, कला व साहित्य या विषयांना वाहिलेले हे एक वाङ्मयीन नियतकालिक होते. १९५४ मध्ये काही समानधर्मीयांच्या सहकार्याने त्यांनी ते सुरू केले. १९६० साली ते त्यांनी बंद केले. रेगे यांनी छंदमध्ये विपुल लेखन तर केलेच; पण त्याची संपादकीय व्यावहारिक व आर्थिक बाजूही आस्थेने संभाळली. ते सरकारी नोकरीत असल्याने छंदवर संपादिका म्हणून त्यांच्या पत्नीचे, सरिता रेगे यांचे नाव छापलेले असे.
भालचंद्र नेमाडे हे विलक्षण समीक्षक प्रत्येय लेखक रेगे यांच्या भाषेचे मूल्यांकन करताना म्हणतात,
“रेगे यांची भाषा केवळ शब्दांचे खेळ करणारी नसून त्यांचा प्रत्येक शब्द सुयोग्य जागी सुयोजित असून त्यात इतकी ताकत असते की, तो संबंध साहित्याचे वजन पेलू शकतो. रेगे यांची शब्दयोजना चिरेबंद असते म्हणूनच “ते शब्दांचे खेळ करून वाचकांना गुंतवून ठेवतात” हे मत पटत नाही. रेगे यांनी शब्दच असे उपयोजिले की, त्यांच्या लेख्यविषयाचे आणि आशयाचे साधारणीकरण झाले, सार्वत्रिकीकरण झाले आणि त्याला सार्वकालिकता प्राप्त झाली.”
0 Response to "व्यक्तीवेध : कविवर्य पु.शि. रेगे"
टिप्पणी पोस्ट करा