व्यक्तिवेध : अहिल्याबाई होळकर
रविवार, २० फेब्रुवारी, २०२२
Comment
इतिहासाने पानोपानी जिची गायली गाथा
होळकरांची तेजस्वी ती पुण्यश्लोक माता
ज्या समाजरचनेत कोणतीही उन्नतीची साधने स्त्रियांना उपलब्ध नसताना, त्या काळी या महान कर्तृत्वशालिनीने ‘पती’ बरोबर ‘सती’ न जाता प्रजापालन करण्यासाठी जीवन जगण्याचा स्वीकार केला!! ही प्रजावत्सल राणी माणसाच्या डोळ्यातील पाणी पुसणारी खरी लोकमंगल माता झाली.
संपूर्ण भारतात अहिल्याबाई होळकर यांचे नाव अत्यंत श्रध्देने गौरविले गेले आहे. ३१ मे १७२५ रोजी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला. अत्यंत समृद्ध अशा राज्याची स्वामिनी असूनही आपली सर्व संपत्ती लोककल्याणार्थ खर्च केली, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांना संरक्षण दिले. भारतीय शिल्प, कला, साहित्य आणि संस्कृती यांची अमोल सेवा केली होती.
ही पुण्यश्लोक माता पुण्यशील अन् धार्मिक म्हणून तर अवघ्या जगास माहीतच आहे, परंतु ठिकठिकाणचे घाट, देवळे, धर्मशाळा, अन्नछत्रे, विहिरी, तळी, कुंडे, रस्ते यांसारखे त्यांचे प्रचंड कार्य तर आसेतुहिमाचल पसरलेले आहे. त्यांनी बांधलेल्या पाणपोया, अन्नछत्रे आज दोनशे वर्षानंतरही चालू आहेत. परंतु आश्चर्याने थक्क करतं ते त्यांचं अपार शहाणपण, मुत्सद्दीपणा, ज्ञानलालसा, असामान्य तडफ, हिशोबातली समूळ पारंगतता, तेज, झुंज घेण्याचा खंबीरपणा, प्रजावत्सलता, अचूक न्यायदान, आत्मविश्वास, पुरुषार्थ, रणकौशल्य, संरक्षणव्यवस्था, गुप्तहेर खाते, स्वाभिमान, राज्यकारभाराची जाण आणि माणुसकीची असणार परतदुःखकातर असं मन!
राजगादीशी असलेली निष्ठा, जिद्द, बाणेदार वृत्ती, साधी राहणी आणि कल्याणकारी विचारसरणी या अनेक सद्गुणांचे त्यांच्या तेजस्वी वागण्याचे, पुरावे इतिहासाच्या पानोपानी आहेत.
पुण्यश्लोक आहिल्याबाई यांच्या वर कोसळलेले कौटुंबिक आघात पाहिले तर त्यांच्या धार्मिक वृत्तीस दोष देण्याचे धारिष्ट्य कोणालाही होणार नाही. पती खंडेरावांचा अकाली मृत्यू, यांच्याबरोबर सती गेलेल्या नऊ सवती, गौतमाबाई आणि मल्हाराव यांचा मृत्यू जरी वयोमानाप्रमाणे झाले तरी अहिल्याबाईंचा आधारच निखळून पडला. मल्हाररावांच्या दोन बायकांना सती जाताना त्यांना पहावं लागलं. याहून भयानक आघात पुढे होतेच. पुत्र मालेराव अवघ्या बावीस वर्षांच्या तरुणवयात मृत्युमुखी पडला. त्याच्या दोन बायका सती गेल्या. मुक्ता ही मुलगी. तिचा मुलगा नथूही बाविसाव्या वर्षी क्षयाला बळी पडला. या दोन चिमण्या नातूसुनांचं सती जाणं, त्यांना बघणं, अहिल्याबाईंच्या दुर्दैवात होतं. शेवटी एक लेक मुक्ता फक्त राहिली होती. जावई यशवंतराव फणसे कॉलऱ्याचा बळी ठरले. आणि मुक्ता तिच्या दोन सवतींसह सती गेली. एकूण पाच जिवलगांचा मृत्यू आणि अठरा सतींच्या किंकाळ्या त्यांनी ऐकल्या. त्यांच्या वेदनांचं, दुःखांचं वर्णन कोण आणि कसं करणार? तरीही ही बाणेदार स्त्री शेवटपर्यंत कोणालाही शरण न जाता कठोर कर्मयोग आचरत राहिली. राज्याचे सेनापती तुकोजी यांचे कर्ज निवारत, पैसा पुरवत राहिली. अहिल्याबाई यांच्या कर्तव्य-कर्माचा पट मोठा आहे. अहिल्याबाईंच्या बुद्धीचा आवाका दांडगा व सामर्थ्य थोर होतं. १३ ऑगस्ट १७९५ रोजी अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू झाला.
मनुष्याच्या मृत्युनंतर जे लिहिले जातं त्यात अतिशयोक्ती येण्याचा फार संभव असतो. परंतु समकालीन लोकांकडून जे लिहिलं, सांगितलं जातं त्यातील खरेपणा वादातीत असतो. माणूस जिवंत असतानाही त्याच्याविषयी गौरवोद्गार निघणे ही गोष्ट पूर्वीच्या काळी क्वचित होईल. आजच्या काळातील सांगता येत नाही. आज तर स्तुतीची पारायणे चालू असतात. सत्ताधाऱ्यांचे वाढदिवस म्हणजे कौतुकाचा समुद्र असतो. पण परंतु पूर्वीच्या काळी जिवंतपणी स्तुती क्वचित एखाद्यालाच लाभे आणि त्यासाठी प्रचंड कर्तुत्व असावे लागे. अहिल्यादेवींना स्तुती विषसमान वाटे. एका कवीच्या वह्या त्यांनी नर्मदेत बुडवल्याची हकीकत ऐकिवात आहे. अशा स्त्रीसमोर जेव्हा स्कॉटलंडमधील कवित्री जोना बेली लिहितात, तेव्हा आश्चर्य वाटते. सुप्रसिद्ध इतिहासकार आणि त्या काळाचे राजकीय दूत सर जॉन माल्कम अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी लिहितात, तेव्हा आपण चकित होतो. कवी मोरोपंत, अनंत फंदी यांनी तर लिहिले आहेच, पण हे परदेशी लेखक परक्या भाषेत अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी गुणगान गातात तेव्हा ते शंभर टक्के खरेच असते.
स्कॉटलंडमधील कवयित्री जोना बेली यांनी अहिल्यादेवींवर एक दीर्घकाव्य लिहिले आहे. त्यात अहिल्याबाईंच्या अंगभूत गुणांचे यथायोग्य वर्णन केले आहे.
For Thirty years her reign of peace,
The land in blessings did increase !
And she was blessed by every tongue...
By stern and gentle, old and young!
याचे भाषांतर श्री हिरालाल शर्मा यांच्या पुस्तकात आलेला आहे ते पुढील प्रमाणे
तीस वर्षे प्रशांत सत्ता त्यांनी गाजविली
वैभव, धन, ऐश्वर्य, संपदा, सदैव वाढविली
सुष्ट, दुष्ट, अन् सान थोर त्या सार्या पौरजनांनी
मुक्त रवाने सती अहिल्या सदैव वानियली
सुप्रसिद्ध इतिहासकार आणि त्या काळाचे पोलिटिकल एजंट सर जॉन माल्कम लिहितात,
“अहिल्याबाई ही एक असामान्य स्त्री आहे. दुराभिमानाचा त्यांना स्पर्शही नाही. धर्मपरायणही असलेली ही स्त्री कमालीची सहनशील आहे, त्यांचे मन रूढीप्रिय असले तरी रूढींचा उपयोग जनकल्याणासाठी करून घ्यायची त्यांची हातोटी विलक्षण आहे. प्रत्येक क्षणाला सद्सदविवेकबुद्धीने कर्तव्य करणारे, हे उच्च प्रतीचे जीवन आहे. त्यांच्या चारित्र्याचा विकास केवळ अद्वितीय असाच आहे”
त्या वेळचे व्हाईसराय लॉर्ड यांनी एका पत्रात म्हटले आहे की,
“अहिल्याबाई एक सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी आणि आदर्श राज्यकर्त्या आहेत. अन्य धर्मियांचा द्वेष त्यांच्या ध्यानी मनी सुद्धा नाही. एका महाराज्याच्या स्वामिनी असूनही त्या तपस्विनी प्रमाणे अगदी साध्या राहतात. शुभ्रवस्त्राखेरीज अन्य वस्त्रे त्यांना त्याज्य आहेत.”
शाहीर प्रभाकर आपल्या कवनात म्हणतात,
सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई
गेली कीर्ति करूनिया भूमंडळाचे ठाई
महाराज आईल्याबाई पुण्यप्राणी
संपूर्ण स्त्रियांमधि श्रेष्ठ रत्नखानी
अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्राचा एकंदर आढावा घेता रुढी-परंपरा, मुळ तत्वे आणि कूटनीती या गोष्टींमधून यांच्या राज्यकारभाराचे चित्र स्पष्ट होते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अहिल्याबाईंच्या अजूनही पाऊलखुणा आहेत. त्यांचे कार्य वेगवेगळ्या रुपात उभे आहे. अहिल्याबाईंनी केलेला दानधर्म प्रजेच्या सुखासाठी केला. त्यांच्या औदार्याचा परिणाम त्यावेळच्या इतर राजांवरही झाला आणि तेही दानधर्म करू लागले. याचे बीज पेरण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले. पुणे ही राजधानी असल्यामुळे पुणे दरबारी अहिल्यादेवींची तेजस्वी छाप पडली होती. “पुणे दरबारचे पुण्यद्वार महेश्वर आहे” असे खुद्द पेशव्यांनी म्हटले आहे.
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी अहिल्यादेवींच्या चरित्र लिहिले आहे की,
“त्यांच्या चरित्रात परस्परविरोधी म्हणून म्हणता येतील असे सर्व गुण होते. एक स्त्री असूनही छानछोकीने राहणे त्यांना कधी आवडले नाही. स्वधर्मावर अतिशय प्रेम असूनही परधर्मी लोकांचा त्यांनी कधी अनादर, राग केला नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर कृपाच केली. भर तारुण्यात वैधव्य आले असतानाही त्यांनी पातिव्रत्याचे पूर्णपणे पालन केले. अफाट संपत्तीची स्वामिनी असूनही एखाद्या तपस्विनीप्रमाणे अत्यंत साधेपणाने त्यांनी जीवन कंठिले. अमर्याद विशाल राज्याची स्वामिनी असूनही त्याचे संचालनातील अतुलनीय चातुर्याने त्या करत. त्यांच्या मनाला अहंकार कधी चुकूनही शिवला नाही. त्या देवभिरू होत्या. त्या स्वतः अत्यंत निर्मळ, शुद्ध अंतःकरणाचा होत्या. अहिल्याबाईंनी इतरांच्या दोषांबद्दल त्यांची घृणा वा तिरस्कार केला नाही. उलट त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच आहिल्याबाई म्हणजे मनुष्यरूप धारण केलेली दिसत देवताच होती असे म्हणणे आपल्याला भाग आहे”
कवी, लेखक, मुत्सद्दी, राजकारणी या सर्वांचा दृष्टिकोन यात आला आहे. अहिल्यादेवी यांच्यात इतके गुणविशेष होते की त्यांचं वर्णन करताना माणसे अहिल्यामय होऊन जातात आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होतात!!!
0 Response to "व्यक्तिवेध : अहिल्याबाई होळकर "
टिप्पणी पोस्ट करा