व्यक्तिवेध : साने गुरुजी

व्यक्तिवेध : साने गुरुजी

 स्त्रीकामगारांचा लढा असो किंवा बेचाळीसचा लढा असो, साने गुरुजी वीर पुरुषांप्रमाणे स्वतः लढले. त्यांच्या आयुष्यातील घडामोडींवर प्रकाश टाकणारा हा एक लेख.
खरे तर साने गुरुजी यांच्या अत्यंतिक सेवाभावामुळे व अथांग करणेमुळे त्याचबरोबर विशेषता ‘श्यामची आई’ या त्यांच्या अमर अशा करुणरम्य पुस्तकामुळे गुरुजींच्या व्यक्तीमत्वाबद्दल ते हळुवार, मुळूमुळू आहेत अशी कल्पना सर्वत्र दिसते. मराठीतल्या काही टीकाकारांनी त्यांना ‘रडके’ म्हणून समजले होते. परंतु साने गुरुजींनी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांप्रमाणेच ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास | कठीण वज्रासी भेदू ऐसे’ अशा बाण्याने व ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या जागृत जाणिवेने प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारकता प्रकट केली आहे‌.

विद्यार्थी, महिला, शेतकरी, आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी त्यांनी लढे दिले आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्य बांधवांना दर्शनासाठी प्रवेश मिळावा म्हणून प्राणांतिक उपोषण आरंभिले होते. त्यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्राचा ‘बडा बंडवाला’ म्हणून ओळख असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराज यांनी तेराव्या शतकात सुरू केलेली सामाजिक क्रांती परंतु जी पंढरपूरच्या वाळवंटात थबकली होती ती विसाव्या शतकाच्या मध्यास साने गुरुजींनी प्रत्यक्ष पांडुरंगाच्या चरणापाशी नेऊन पोहोचवली.

त्या काळी देशाच्या स्वातंत्र्याला महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशात भरास आला होता. साने गुरुजी हे त्यावेळी प्रत्येक लढ्यात मोठ्या हिरीरीने उतरले होते. आणि अनेक वेळा त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वातच एक सर्वस्व समर्पणाची भावना ज्वलंत निवास करीत होती. आणि म्हणूनच गिरणी कामगारांचा प्रश्‍न असो, स्त्री कामगारांचा लढा असो, काँग्रेसची निवडणूक असो किंवा बेचाळीससारखा स्वातंत्र्यांचा अंतिम लढा असो, साने गुरुजी हे वीर पुरुषाप्रमाणे स्वतः उठले देशातल्या तरुणांना उठवले, स्वतः पेटले व देशातल्या असंख्य तरुणांनाही पेटवले. त्यांनीच एका ठिकाणी म्हटले आहे “एका अमेरिकन कवीच्या काव्यातील काव्यपंक्ती फार आवडते. “When I give, I give all.” देताना मी सर्वस्वाने देतो. हात राखून देण्याची प्रवृत्ती मला मानवत नाही” आणि याच भावनेने गुरुजी आयुष्यभर लढले, झुंजले आणि महाराष्ट्रातील तरुणांचे ‘सेनानी’ बनले.

साने गुरुजी यांचे घराणे मूळचे देवरूखचे. परंतु पुढे कालांतराने त्यातील काही शाखा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड या गावी स्थायिक झाल्या. या पालगड गावीच श्री सदाशिवराव उर्फ भाऊ राव आणि सौ. यशोदाबाई उर्फ बयो दांपत्याच्या पोटी २४ डिसेंबर १८९९ रोजी साने गुरुजींचा जन्म झाला‌‌. बारशाच्या दिवशी नाव ठेवले होते पंढरीनाथ. पुढे शाळेत घालण्याच्या वेळी तो झाला पांडुरंग. ‘पांडुरंग सदाशिव साने’ व नंतर पुढे ते महाराष्ट्राचे ‘सानेगुरुजी’ म्हणून प्रसिद्ध झाले

मराठी मुलखात मातृधर्माचे शिवार प्राचीन काळापासून बहरलेले आहे. खरं तर भारतीय संस्कृतीने देखील ‘मातृदेवो भव’ अशी प्रथम वंदनाच मातेला दिलेली आहे. आणि याच परंपरेत आधुनिक महाराष्ट्रात बाळगोपाळांना गोष्टी सांगून आपल्या आईच्या कथाकहाण्यांनी डोळे पाणावून सोडणाऱ्या आईची महती ‘श्यामची आई’ आपल्या अक्षरवाङ्मयात श्रेष्ठ असलेल्या पुस्तकाने गायली. हा ‘श्याम’ म्हणजेच साने गुरूजी!

सानेगुरुजींच्या बाबतीत निसर्गाने एक चमत्कारच केलेला दिसतो. गुरुजी प्रकृतीने पुरुष पण कृतीने मातेचे हृदय त्यांना लाभलेले दिसते. म्हणूनच त्यांना मातृधर्मी सानेगुरुजी असे म्हटले जाते. मातृधर्मी साने गुरुजींनी मराठी मुलखात सर्वांना आईचे प्रेम भरभरून दिले. आचार्य अत्रे यांनी तर “साने गुरुजींची श्यामची आई म्हणजे मातेचे महन्मंगल स्तोत्र आहे” असे म्हटले आहे. खरेतर मातृत्वाने साने गुरुजींचे ह्रदय एकसारखे ओसंडत होते. म्हणूनच त्यांच्या वाणीतून आणि लेखणीतून बाहेर पडणारे प्रत्येक अक्षर अन् अक्षर पावित्र्याने आणि मांगल्याने ओथंबून निघालेले दिसते.

मातृहृदयी साने गुरुजींनी आपल्या उण्यापुऱ्या एकावन्न वर्षाच्या आयुष्यात मराठी मुलखात बरीच मोठी कामे केली. एका साने गुरुजींमध्ये विविध स्वरूपातील सानेगुरुजी होते. मातृप्रेमि व मातृधर्मी साने गुरुजी, आदर्श शिक्षक सानेगुरुजी, स्वातंत्र्यलढ्यातील व समाजसेवक क्रांतिकारक सानेगुरुजी, किसान कामगारांचे व गोरगरीब दलितांचे आणि शोषित महिलांचे कैवारी सानेगुरुजी, साहित्यिक साने गुरुजी, कवी साने गुरुजी, भारतीय संस्कृतीचे भाष्यकार सानेगुरुजी, लोकसाहित्याचे संग्राहक व परभाषेतील उत्तमोत्तम ग्रंथांचे अनुवादक आणि रूपांतरकार सानेगुरुजी, संपादक पत्रकार सानेगुरुजी, मुलांचे मनोरंजन करता करता त्यातूनच प्रभूशी नाते जोडणारे सानेगुरुजी, आंतरभारती चे प्रवक्ते साने गुरुजी या रूपातील साने गुरुजींचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी बहुआयामी — ‘मल्टिडायमेंशनल’ होते!

‘गुरुजी’ हे बिरुद त्यांच्याइतके महाराष्ट्रात अन्य कोणीही सार्थ केलेले नाही. तसेच साने गुरुजी अंमळनेरच्या शाळेत शिक्षक म्हणून पाच-सहा वर्षेच होते. परंतु शाळेच्या चिमण्या जगाचा निरोप घेऊन या राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्यावरसुद्धा त्यांनी आपली शिक्षकाची भूमिका कधीच सोडली नव्हती. समाजातशिक्षणाचे कार्य अनेकांगांनी ते सतत करीतच राहिले आणि महाराष्ट्राचे गुरुजी बनले.

‘खरा तो एकची धर्म | जगाला प्रेम अर्पावे’ अशा तर्‍हेने आपल्या वागणुकीतून, शिकवणीतून सर्वत्र प्रेमधर्माची शिकवण साने गुरुजींनी दिली. प्रेमाच्या फडाचे ते फडकरीच होते. प्रेमाचे दिंडीचे ते दिंडीकरच होते. त्यांची प्रेमदिंडी आपण अशीच पुढे नेऊया!

0 Response to "व्यक्तिवेध : साने गुरुजी "

टिप्पणी पोस्ट करा