व्यक्तीवेध : संत दासगणू महाराज
रविवार, २० फेब्रुवारी, २०२२
Comment
शिर्डी माझे पंढरपुर ।
साईबाबा रमावर ॥१॥
शुद्ध भक्ती चंद्रभागा ।
भाव पुंडलिक जागा ॥२॥
या हो या हो अवघे जन ।
करा बाबांसी वंदन ॥३॥
गणु म्हणे बाबा साई ।
धाव पाव माझे आई ॥४॥
ही शिर्डीच्या साईबाबांची आरती आपण नक्कीच ऐकली असेल. या आरतीचे निर्माते आहेत संत दासगणू महाराज.
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक साधू संत होऊन गेले, हे राज्य अनेक संतांची कर्मभूमी, जन्मभूमी राहिलेली आहे. संतांनी दिलेली शिकवण ही वैयक्तिक दृष्ट्या व्यक्तीस व सामाजिक दृष्ट्या सर्व समाजास उन्नत करणारी असते. ही साधू संतांची परंपरा पूर्वीपासून या राज्यात आहे व आजही त्याच साधुसंतांच्या कार्याला मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशाच संत परंपरेतील एक संत ज्यांनी “शिर्डी माझे पंढरपूर" ही आरती लिहिणारे संत दासगणू हे होय.
संत दासगणू महाराजांचे पूर्ण नाव गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे होय. बालवयात ते अतिशय उनाड होते. शिवाय शिक्षणात देखील म्हणावे तसे लक्ष लागत नव्हते. जेमतेम चौथ्या इयत्तेपर्यंत त्यांचे शालेय शिक्षण झाले होते. त्यांचे मित्रही त्यांच्यासारखेच. त्यामुळे बालपण खोड्या करण्यात गेले. शिवाय ते घरात लहानवयापासूनच सर्वांचे लाडके होते. परंतु स्वच्छ चारित्र्य, वागण्यातील बाणेदारपणा व काव्यलेखन हे काही गुण त्यांच्यात अभिजातपणेच होते. परंतु शिक्षणात दासगणुंचे लक्ष लागावे यासाठी घरातील सर्व मंडळी प्रयत्न करून थकली होती. परंतु त्यांची बुद्धी ही शृंगारसाहित्याकडे जास्त झुकलेली होती. त्यामुळे सुरुवातीला अशाप्रकारचे साहित्य ज्यात लावणी, छक्कड इत्यादींचा समावेश होता, असे लेखन त्यांनी केले.
त्यानंतर दासगणू यांनी पोलीस खात्यात हवालदार म्हणून नोकरी स्वीकारली. त्यांचे लग्नही झाले. त्यांच्या जीवनात त्यांचे अधिकारी व संस्कृत पंडित वामनशास्त्री इस्लामपूरकर यांच्या सहवासामुळे खूप मोठा बदल झाला. त्यातून त्यांचे पुर्ण आयुष्यच बदलले व दासगणू वरचेवर अध्यात्माकडे झुकू लागले. त्यांनी श्री वामनशास्त्री यांचा अनुग्रह घेतला व त्यांच्या आज्ञेप्रमाणे दासगणू वागू लागले व त्यांच्याच आज्ञेने त्यांच्यानंतर दासगणूंनी संत साईबाबा यांना गुरू मानले व अध्यात्म भक्ती या क्षेत्रात ‘दासगणू’ या नावाने नव्या पर्वाला सुरुवात झाली. संत दासगणूंनी “त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्या काळाचा परिस्थितीचा विचार करता चे कार्य केले ते एका ऐतिहासिक कार्य आहे.”
संत दासगणू महाराजांचा कार्यकाळ १९ व्या शतकाच्या उत्तरार्ध ते विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या सुरुवातीचा होय. त्यांचा जन्म दिनांक ६ जानेवारी १८६८ रोजी व महानिर्याण २६ नोव्हेंबर १९६२ रोजी झाले. जवळपास ९५ वर्षे इतकी प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभले होते. या दीर्घ जीवन काळात त्यांनी जे कार्य केले ते एक ऐतिहासिक कार्य आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी विविध प्रकारे लेखनकार्य केले.
संत दासगणू महाराज यांचे आयुष्य दोन महत्त्वाच्या टप्प्यांत सांगता येईल. एक म्हणजे जन्मापासून ते गुरूचा उपदेश घेण्यापर्यंतचा काळ व दुसरा म्हणजे गुरुपदेश व त्यानंतर उर्वरित सर्व आयुष्य. पहिल्या टप्प्यात त्यांनी वाङ्मय निर्मिती केली पण ती शृंगारसाहित्याची. मात्र गुरुपदेश आल्यानंतर त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला व त्यांच्या हातून प्रचंड असे काव्य निर्माण झाले. या काव्यात अनेक संतचरित्रे, भावार्थ प्रतिपादक ग्रंथ, किर्तनोपयोगी आख्याने, जन्माख्याने, स्फूटरचना, खंडकाव्य व इतर विविध विषयांवरील रचना यांचा समावेश होतो. त्यांच्या लेखनाची ओवीसंख्या ही जवळपास पाऊणलाखांच्यावर आहे म्हणूनच त्यांना ‘संत कवी’ तसेच ‘आधुनिक महिपती’ असे म्हटले जाते.
यातील किर्तनाख्याने, लोकोत्तर व्यक्ती, संत, सामाजिक आशय, विविध अपूर्ण रचना, बहुनायकात्मक व एकनायकात्मक संत चरित्रे लिहीत असताना त्यांनी साधार माहिती घेऊन लेखन केले आहे. ज्या संतांचे चरित्र वा आख्यान लिहायचे आहे त्यांची लेखनापूर्वी माहिती त्या त्या वेळेच्या गावी जाऊन मिळवणे, कागदपत्रे असतील तर ती तपासून घेणे, विविध संबंधित व्यक्तींशी याबाबतीत बोलणे व त्यानंतर लेखन करणे अशी श्री दासगणू यांची काव्य निर्माण करण्याची रीत होती. जी ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची आहे. खरे पाहता संत दासगणू महाराजांचा जीवन काळ हा भारतीय स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर असा आहे त्यामुळे भारताचे पारतंत्र, त्या काळातील घटनांची ते स्वतः समकालीन असल्याकारणाने त्याविषयीची माहिती ही दासगणूंचा मिठाचा पोवाडा, भारत करूण-कहाणी, अभागी भारत, कर्मकहाणी या रचनांमधून मिळते, ती ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची आहे.
संत दासगणू महाराजांनी कीर्तनरचना करताना स्थळ, काळ, परिस्थितीचे भान ठेऊन विचार केल्याचे दिसून येते. संत दासगणू यांनी ही किर्तन पद्धती अशी प्रभावीपणे चालवली की किर्तनक्षेत्राच्या इतिहासाची काही सुवर्णपाने त्यांनी स्वतःच्या नावे केली आहेत. ते कधीही बिदागी (मोबदला) घेत नसत. हे किर्तनकार्य, पद्धती त्यांनी फक्त स्वतःपुरती न ठेवता शिष्यांनाही शिकवली. त्यानंतर दासगणूंमुळे कीर्तनकारांच्या पिढ्या निर्माण झाल्या, ज्या आजही हे कार्य करीत आहेत.
ReplyForward |
0 Response to "व्यक्तीवेध : संत दासगणू महाराज"
टिप्पणी पोस्ट करा