व्यक्तिवेध : क्रांतिसिंह नाना पाटील
रविवार, २० फेब्रुवारी, २०२२
Comment
“क्रांतिसिंह” हा शब्दच जणू काही नाना पाटीलांसाठी निर्माण झालेला होता.
“नाना पाटील नाही एकला ।
त्याच्या दिमतीला आज उभा ठेला ।
पोलादी संघटना लोकात ।
शेकड्याने सरस्वती हातात ।। जी....
पकडील कोण नानाला ।
आमच्या नेत्याला
बातमी जो देईल नीच इंग्रजास ।
दिवा नाही ठेवणार त्याच्या वंशास ।। जी....
लाथेने उडवा पाटीलकी ।
झेलु नका थुकी । सोडून लायकी ।
तुम्ही राजे देशाचे ।
हक्क मिळताच स्वराज्याचे । तुम्ही आमचे नि आम्ही तुमचे ।। जी...
हाकलून देऊ गोऱ्याला ।
हरामखोराला । नीचे राज्याला ।
घेऊया परत राज्य आपुले ।
कायद्याचे भय आता कसले । प्रतिसरकार सुरू झाले ।। जी...
कोण पकडील क्रांतीवीराला नाना पाटलाला । आमच्या नेत्याला ।
पकडील कोण पळत्या वाऱ्याला ।
धरील कोण जळत्या अग्नीला ।
गवसणी कोण घालील आभाळाला ।। जी...
- रचना : ग. दि. माडगूळकर
“क्रांतिसिंह” म्हणताच नाना पाटलांचे नाव आपणास पटकन आठवते. इतकेच नव्हे तर “क्रांतिसिंह” हा शब्द जणू काही त्यांच्यासाठी निर्माण झालेला आहे असे वाटावे. इतपत त्यांचे नाते अभेद्य आहे.
साधारणता १९२८ ते १९७६ या काळातील महाराष्ट्राचे सामाजिक, राजकीय जीवन समजून घ्यायचे असेल तर क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जीवनचरित्र समजून घ्यायलाच हवे .त्यांचे जीवन चरित्र म्हणजेच मराठी माणसाचा अखंड प्रेरणास्रोत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील हे एक ऐतिहासिक आक्रीत घडलेलं आहे. “महाराष्ट्राच्या इतिहासाने त्यांना घडविले आणि त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास घडविला” असेच म्हणणे आपल्याला भाग आहे.
महात्मा फुलेंच्या मृत्यू नंतर दहा वर्षांनी ३ ऑगस्ट १९०० रोजी नाना पाटलांचा जन्म झाला. राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मण, प्रभू, पारशी, शेणवी अशा पुढारलेल्या जात-धर्म विभागाच्या लोकांना वगळून इतर सर्वांसाठी राखीव जागा ठेवण्याचा जगाच्या पातळीवरील महत्त्वाचा ठरणारा ऐतिहासिक निर्णय घेतला तो क्रांतिसिंह यांच्या जन्मानंतर दोनच वर्षांनी म्हणजे १९०२ साली. नाना पाटील ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना या काळात सातारा जिल्ह्यातील कुळ शेतकरी आणि बलुतेदारांचा संयुक्त संप आणि संघर्ष ग्रामीण भागातील परिवर्तनाची वाट उजळून गेला. त्याचबरोबर महात्मा गांधींसारखे बहुजन स्त्री-पुरुषांपर्यंत पोहोचणारे धोरणी नेतृत्व राष्ट्रीय काँग्रेसमध्ये उगम पावण्याच्या काळात क्रांतिसिंह वर्षांचे होते.
येडेमच्छिंद्र हे क्रांतिसिंह यांचे जन्मगाव या गावाचे शिवाय कृष्णा नदीच्या काठावर असले तरी हे गाव डोंगराजवळ वसलेले आहे या गावात शेजारीच मच्छिंद्रगड नावाचा किल्ला आहे नाथपंथातील मच्छिंद्रनाथांचे ठाणे सुद्धा याच किल्ल्यावर आहे महाराष्ट्रात जातीव्यवस्थेचे विरोधी जे प्रवाह झाले त्यातलाच नाथपंथ होता हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे गावाचे नाव सुद्धा मच्छिंद्रनाथ यांचा समावेश करणारे आहे क्रांतिसिंह अनेक वेळा येडे या नावावरून स्वतःच्या भाषणात विनोद किती तासात मी वेड्याचा एवढे म्हण यातूनही संपूर्ण समुदायाला हसू फुटत असे
क्रांतिसिंह यांच्या १९३० ते १९४२ या काळातल्या कार्याचे वर्णन त्यांचे एक प्रमुख शिष्य आणि वारसदार क्रांतिवीर नागनाथ नायकवडी फार चांगल्या प्रकारे करतात. ते म्हणतात :
“वडिलांनी जमीन चांगली उभी-आडवी खोल नांगरावी, उन्हाळ्यातल्या कुळवाच्या पाळ्या द्याव्या, जमीन चांगली गुलालागत करावी, चांगलं भरपूर शेणखत पसरावं, ताग गाडावा, आणि एवढं सगळं केल्यावर मुलांनी पेरणी करून आयतं पीक घ्यावं. तसंच प्रतिसरकारमध्ये पुढाकाराने काम करणाऱ्या त्यावेळी तरुण असलेल्या आम्हा मंडळींचं आहे. नाना पाटीलांनी त्या काळातला सातारा जिल्हा असाच विचारांच्या नांगराने उभा-आडवा नांगरला गावागावापर्यंत पोहचून कुणबी कुरवाडी आणि बारा बलुतेदार बहुजन जनतेच्या मनाची मशागत केली. स्वातंत्रासाठी मरायला तयार होणारी माणसं तयार केली आणि आम्ही तरुणांनी या प्रतिसरकारचा पीक घेतला पण तेही त्यांच्याच नेतृत्वाखाली घेतलं. सर्वच प्रतिसरकारवाल्यांना नाना पाटलांचेच नाव घ्यावं लागेल कारण जनता नाना पाटलांची होती.
क्रांतिसिंह नाना पाटील खरे गाजले ते १९४२ च्या सातारच्या प्रतीसरकारचे नेते म्हणून. पण हे नेतृत्व त्यांना प्राप्त करून देणारा कष्टाचा काळाचा होता तो १९३० ते १९४२ चा. याच काळात नाना पाटलांनी जनतेला क्रांतीप्रवण केले आणि पुढच्या संघर्षासाठी घडवले. आणि याच काळात जनतेने नाना पाटलांना क्रांतिसिंह बनवत नेले. क्रांतिसिंह म्हणून घडवले.
पोलिसांच्या हाती सापडलेल्या प्रतिसरकारच्या प्रत्येक भूमिगताने सपाटून मार खाल्ल्यावर “हे पत्र अथवा हे रिवाल्वर तुला कोणी दिले?” या प्रश्नावर “मला नाना पाटलांनी गावाच्या बाहेर झाडाखाली दिले” हेच उत्तर असायचे. त्यामुळे नाना पाटील म्हणजे फार भयंकर प्रकरण आहे, असे सरकारला वाटू लागले सरकारच्या पोलिस खात्याने त्यांना पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण लोकांच्या पाठिंबा मुळे नाना पाटील स्वातंत्र्य मिळेपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
“प्रतीसरकारचे काम हे हिंसक आहे, महात्मा गांधींना हिंसा मान्य नाही. त्यामुळे प्रतिसरकार काँग्रेसच्या काळात चळवळीचा भाग असू शकत नाही” असा प्रचार शहरी काँग्रेसवाल्यांनी सुरू केला. तेव्हा गांधीजी उद्गारले :
“नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही ४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली. सातारा हे या चळवळीचे नाव राखले, हे महत्त्वाचे होय. नाना, तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असा मानणारा मी आहे.”
ही आठवण प्रतिसरकारच्या आणि महात्मा गांधीजींच्या ही इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे.
पुढे १५ ऑगस्ट १९४७ रोजी या देशाची सत्ता ब्रिटिश साम्राज्यवादी भांडवलदारांच्या हातून स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व असलेल्या काँग्रेसच्या हातात आली. ऑगस्टच्या काँग्रेसच्या ठरावाप्रमाणे ‘कामगार-शेतकऱ्यांचे प्रजाराज्य’ मात्र आले नाही.
“या गरिबांनो या, झेंडा हाती घ्या ।
काँग्रेसची हा तुम्हाला हाय हो ।।”
या गाण्यातले ध्येय गाठले गेले नाही. ज्या ध्येयाने हुतात्म्यांनी प्राणार्पण केले, त्यांचे ध्येय, त्यांची स्वप्नांची परिपूर्ती झाली नाही. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकारने संघर्ष केला. त्यांच्या बहुसंख्य प्रमुख कार्यकर्त्यांना आणि खुद्द क्रांतीसिंहांना १५ ऑगस्ट १९४७ रोजीचे स्वातंत्र्य हे भांडवलदारांच्या हातात गेल्याचे दिसले. बहुजन-कष्टकरी जनतेचे खरेखुरे स्वातंत्र्य दूरच राहिले. याचा अनुभव त्यांना १५ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून आणि त्यानंतरही लगेचच आला.
गांधीजींच्या खुनानंतर लोकांचा सगळा राग ब्राह्मणांवर निघाला. यामध्ये नाना पाटलांचे नाव उगाचच आले असता, याचा ठपका नाना पाटलांवर ठेवला असता मुंबई राज्याचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांचा चांगलाच पाणउतारा केला होता.
पुढे १८५२ च्या पहिल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर क्रांतिसिंह नाना पाटील, दत्ता देशमुख, भाई सढ्या अशी शेतकरी कामगार पक्षातली मंडळी यांनी एकत्र येऊन ‘कामगार किसान पक्ष’ स्थापन केला. परंतु ऐन निवडणुकांच्या तोंडावर यांच्यामध्ये फूट पडली श. या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आणि कामगार किसान पक्ष व डावे समाजवादी पक्ष अशा डाव्या पक्षांच्या तीन आघाड्या रिंगणात उतरल्या. कॉंग्रेसला विरोध करण्याबरोबर त्या एकमेकांविरुद्धही उभ्या राहिल्या. क्रांतिसिंह नाना पाटील कामगार किसान पक्षात असल्यामुळे डाव्या समाजवादी पक्षासह संयुक्तपणे ते निवडणुकीत उतरले. जुन्या सातारा जिल्ह्यातील प्रतिसरकारची अर्धी कार्यकर्त्यांची फळी काँग्रेसमध्येच राहिली. आणि आर्धी डाव्या पक्षांमध्ये गेली. पण १९५२ साली डाव्या पक्षांमध्ये गेलेले पुढारी एकमेकांविरुद्ध उभे राहिले. याचा फायदा काँग्रेसला झाला. आणि नाना पाटलांचा सर्व डावे पुढारी एकमेकांची मते विभागली गेल्यामुळे सपशेल पराभूत झाले. पुढे क्रांतिसिंह नाना पाटील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले ते अखेरपर्यंत.
पुढे क्रांतिसिंहांना १९५७ च्या निवडणुकांमध्ये जनतेने कम्युनिस्ट पक्ष आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघातून उभे केले आणि प्रचंड बहुमताने निवडून आणले. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही क्रांतिसिंह नाना पाटलांनी सहभाग घेतला. झंझावाती दौरे करून महाराष्ट्रातल्या जनतेला खवळलेल्या समुद्राप्रमाणे उभे करण्यात त्यांचा सर्वात मोठा वाटा होता.
या आंदोलनात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीचे १२ नेते आणि ४३५ कार्यकर्ते जेलमध्ये टाकले गेले. सशस्त्र प्रतिसरकारचा स्वातंत्र्यवीर १९३० सालापासून पायाला भिंगरी लावून स्वातंत्र्याची कॉंग्रेस ज्याने तळागाळापर्यंत पोहोचवली तो क्रांतिसिंह बंदिवान केला गेला.
यात नाना पाटलांसह प्रबोधनकार ठाकरे, लालजी पेंडसे, रसिक भट वगैरे मंडळींचा समावेश होता. जानेवारीच्या १६ तारखेपासून ते १६ ऑक्टोबर १९५६ पर्यंत क्रांतिसिंह नाना पाटील नाशिक सेंट्रल जेलमध्ये होते.
क्रांतिसिंह नाना पाटील नाशिक जेलमधून बाहेर आले तोपर्यंत सार्वत्रिक निवडणुकांचे ढोल वाजू लागले होते. ८ नोव्हेंबर १९५६ रोजीच शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनने बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीत प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी पाच अटींवर हा पाठिंबा दिला होता. सर्व राखीव जागांवर शे.का.फे. चे उमेदवार उभे केले पाहिजे, त्याशिवाय काही सर्वसाधारण खुल्या जागांवर उमेदवार उभे करावेत.शेकाफे स्वतंत्र पक्ष म्हणून स्वतःची ओळख कायम ठेवील. समितीने परिणामकारक काँग्रेसविरोधी आघाडी म्हणून काम केले पाहिजे आणि दलितांच्या समस्या सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पाहिजे. अशा अटी होत्या.
संयुक्त महाराष्ट्र समितीला या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले याच निवडणूकीने नाना पाटील यांना देशाचा लोकसभेत खासदार म्हणून पाठविले. काँग्रेसचे या निवडणूक पानिपत झाले. निवडणुकीत काँग्रेसला विधानसभेच्या महाराष्ट्रातील १३६ जागांपैकी फक्त ३३ जागा आणि लोकसभेत २२ पैकी दोनच जागा कॉंग्रेसला जिंकता आल्या. १९५७ मधील या निवडणुकीत नाना पाटील उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. जनतेने काँग्रेसला लाथाडल्याचे या निकालातून उघड झाले. समितीचा विजय आणि काँग्रेसचा दारुण पराभव यात क्रांतीसिंहांचा फारच मोठा वाटा होता. खासदार झाल्यानंतर नाना पाटील यांनी लोकसभेतील पहिले मराठी भाषेतले भाषण केले. हे भाषण संयुक्त महाराष्ट्राच्या मागणी विषयी होते. ते संपूर्ण देशात गाजले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिलेच खासदार होते.
पुढे १ मे १९६० रोजी बेळगाव, कारवार, डांग, उंबरगाव, भालकी, संतपुर वगळून संयुक्त महाराष्ट्र केल्याची औपचारीक घोषणा झाली. लढ्याचा एक मोठा टप्पा गाठला गेला होता. या पाठोपाठ क्रांतिसिंह यांच्या वयाला साठ वर्षे पूर्ण होण्याच्या प्रसंगी त्यांचा भव्य सत्कार मुंबई येथे झाला. क्रांतीसिंह याप्रसंगी म्हणतात,
“अजून संयुक्त महाराष्ट्राची पुरती ‘मळणी’ झाली नाही. मुंबई ही पहिली ‘रास’ आली. अजून बेळगाव, कारवार, डांग, उंबरगाव, गोवा ही रास राहिली आहे. अजून लई दाने मागे उरले हायती”
क्रांतिसिंह नाना पाटील १९६७ साली बीड लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांना लोकसभेत निवडून गेले. परंतु पुन्हा एकदा कम्युनिस्ट पक्षात फूट पडली. ‘नक्षलवादी’ म्हणून ओळखली जाणारी नवी कम्युनिस्ट फळी उदयाला आली. क्रांतिसिंह यांनी पुढे आणीबाणीचा काळही पाहिला.
क्रांतिसिंहांनी जनतेत सततपणे राहणं, प्रबोधन करणं, लोकांची उठावणी करणं हे अभिवचन तंतोतंत पाळलं. शेवटच्या घटका जवळ आलेली असताना देखील ते २३ नोव्हेंबर १९७६ रोजी विटा येथे त्यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला गेले असता भाषणाला उभे राहिले. आणि एकाच घणागाती आणीबाणीवर टीका करणारे बरेच काही सांगून गेले आणि कोसळले. ते पुन्हा परत आलेच नाही. त्यांचे निर्वाण त्याच बेशुद्ध अवस्थेत झाले.
“नाना पाटील गेले. आणि एक विचार मनाला चटका लावून गेला की, इतिहास एका प्रचंड सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग करू शकला नाही”
0 Response to "व्यक्तिवेध : क्रांतिसिंह नाना पाटील "
टिप्पणी पोस्ट करा